सोलापूर : ज्या घटकांच्या घामावर आणि त्यागावर समाज उभा आहे, परंतु ज्यांची दखल सहसा कोणी घेत नाही, अशा घटकांचा यथोचित सन्मान करत सोलापूरच्या इतिहासात रविवारी एका अभूतपूर्व आणि ऐतिहासिक सोहळ्याची नोंद झाली. श्री. वि. गु. शिवदारे प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात स्वातंत्र्यसैनिकांचे वारसदार, १२ बलुतेदार आणि श्रमजीवींचा विशेष गौरव करण्यात आला. हा क्षण सोलापूरकरांसाठी अत्यंत भावुक आणि अभिमानास्पद ठरला.
थोर स्वातंत्र्यसेनानी, सहकार महर्षी व माजी आमदार कै. वि. गु. शिवदारे अण्णा यांच्या जन्मशताब्दी वर्षाचा सांगता समारंभ आणि ऑगस्ट क्रांतीदिनाचे औचित्य साधून हुतात्मा स्मृती मंदिर येथे या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
समाजात अहोरात्र कष्ट उपसणाऱ्या श्रमजीवींची आणि देशाच्या स्वातंत्र्यासाठी सर्वस्वाचा त्याग करणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांच्या वारसदारांची नेहमीच उपेक्षा होते. मात्र, या सर्व घटकांना एकाच व्यासपीठावर आणून त्यांचा जाहीर गौरव केल्याने उपस्थित अनेकांचे डोळे पानवले. सोलापूरच्या सामाजिक आणि सांस्कृतिक इतिहासात असा कार्यक्रम पहिल्यांदाच घडल्याने या उपक्रमाचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.
अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी, सोलापूर शहर मध्यचे आमदार देवेंद्र कोठे यांनी उपस्थित राहून सर्व सन्मानार्थींचे कौतुक केले. कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाच्या 'महात्मा गांधी अध्यासन केंद्रा'चे समन्वयक डॉ. प्रकाश पवार यांनीही या स्वागत केले. डॉ. पवार यांनी यावेळी सोलापूरच्या इतिहासाचा आढावा घेतला.
मंचावर श्री. वि. गु. शिवदारे प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजशेखर शिवदारे, सिद्धेश्वर बँकेचे चेअरमन नरेंद्र गंभीरे, माजी अध्यक्ष प्रकाश वाले यांच्यासह कै. वि. गु. शिवदारे जन्मशताब्दी समारोह समितीचे सदस्य उपस्थित होते.
स्वातंत्र्य लढ्याचे अभ्यासक श्रीकांत येळेगावकर यांनी ऑगस्ट क्रांतीचा इतिहास सांगितला.
राजशेखर शिवदारे म्हणाले, ‘ज्यांच्याकडे समाजाचे लक्ष जात नाही अशांचा आपण सन्मान केला आहे. शिवदारे अण्णांनी आयुष्यभर समाजसेवा केली. त्याचा वारसा आम्ही पुढे नेत आहोत.’
आमदार देवेंद्र कोठे म्हणाले, ‘शिवदारे अण्णांची जन्मशताब्दी आगळ्या वेगळ्या उपक्रमांनी साजरी होत आहे. सोलापूरसाठी अण्णांचे योगदान महत्वाचे आहे. त्यांनी समाजासाठी शिक्षण संस्था, सहकारी संस्था स्थापन केल्या. राजशेखर शिवदारे हे अण्णांचा वारसा पुढे नेत आहेत. हा कार्यक्रम सर्वांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.
अनेक वर्षे रखडलेले सोलापूरचे प्रश्न सोडवण्यासाठी मी प्रयत्नशील आहे. सोलापूरला रोज पाणी नाही दिले तर पुढच्या निवडणुकीला मत मागायला येणार नाही. उड्डाणपुलाचे काम लवकरच सुरू होईल. आयटी पार्कचे काम सुरू होत आहे.’
आमदार सचिन कल्याणशेट्टी म्हणाले, ‘शिवदारे अण्णांचा वारसा राजशेखर शिवदारे चालवत आहेत. तत्त्वाशी एकनिष्ठ राहून समाजसेवा करत आहेत. स्वतंत्र सैनिकांचे वारसदार, बाराबलुतेदार आणि श्रमजीवी यांचा सत्कार खरोखरच स्वागतार्ह आहे. पूर्वीचे नेते कोणत्याही अपेक्षेशिवाय काम करत होते. आता लोकांच्याच अपेक्षा खूप वाढल्या आहेत. राजकीय नुकसान झाले तरी राजशेखर शिवदारे यांनी स्वभाव बदलला नाही. आज कोणीही तुमच्याकडे बोट करू शकत नाही. समाज चालवण्यासाठी सर्व घटकांची गरज आहे. याच सर्व घटकांचा सन्मान आज शिवदारे प्रतिष्ठानने केला आहे.’
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शोभा बोल्ली यांनी केले. या सोहळ्यास सुभाष मुनाळे, भिमाशंकर पटणे, प्रमोद बिराजदार, भिमाशंकर शेटे, गदगेप्पा कोरवार, सुरेश वडगावे, अनमोल वळसंगे, सौ.भारती शिवदारे, सौ. सुचेता थोबडे, सौ.भारती कटारे, सौ.शोभा कोरवार यांच्यासह वि गु. शिवदारे प्रतिष्ठान, सिद्धेश्वर बँक, शिवदारे शैक्षणिक संकुल, ग्राहक भांडार, स्वामी समर्थ सूत मिल व
सिद्ध संग प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी, समस्त शिवदारे कुटुंबीय उपस्थित होते.

0 Comments