Ticker

6/recent/ticker-posts

सोलापूरच्या विकासाचा शिल्पकार, संघर्षातून देशाच्या सर्वोच्च पदांपर्यंत पोहोचलेले लोकनेते सुशीलकुमार शिंदे



स्वकर्तृत्व, संघर्ष, संयम, अभ्यासू वृत्ती आणि सर्वसमावेशक नेतृत्वाच्या बळावर महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात आपला अमीट ठसा उमटविणारे, सोलापूरचे सुपुत्र, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, भारताचे माजी केंद्रीय गृहमंत्री व ऊर्जामंत्री, लोकसभेतील काँग्रेसचे माजी नेते आणि महाराष्ट्राचे सलग नऊ वेळा अर्थसंकल्प मांडणारे माजी अर्थमंत्री आदरणीय सुशीलकुमार शिंदे साहेब यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!


सोलापूरच्या मातीतून सामान्य कुटुंबातून आपल्या सार्वजनिक जीवनाची सुरुवात करून संघर्ष, मेहनत आणि जनसेवेच्या माध्यमातून राज्याच्या आणि देशाच्या राजकारणातील सर्वोच्च जबाबदाऱ्या सांभाळण्यापर्यंतचा सुशीलकुमार शिंदे साहेबांचा प्रवास हा प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे. मंत्री, मुख्यमंत्री, राज्यपाल, केंद्रीय मंत्री, केंद्रीय गृहमंत्री आणि लोकसभेतील काँग्रेसचे नेते अशा विविध जबाबदाऱ्या त्यांनी समर्थपणे पार पाडल्या. काँग्रेस पक्षाशी असलेली त्यांची निष्ठा आणि विचारांशी असलेली बांधिलकी त्यांच्या संपूर्ण राजकीय प्रवासात दिसून येते.


सुशीलकुमार शिंदे साहेबांच्या व्यक्तिमत्त्वाची खरी ओळख त्यांच्या सुसंस्कृत, संयमी, हसतमुख आणि सर्वांना सोबत घेऊन जाणाऱ्या स्वभावात आहे. राजकीय मतभेद असले तरी वैयक्तिक संबंधांमध्ये कटुता येऊ न देणे, विरोधी पक्षातील नेत्यांशीही सलोख्याचे संबंध ठेवणे आणि विकासकामांसाठी पक्षभेद विसरून सहकार्य करणे ही त्यांच्या नेतृत्वाची वैशिष्ट्ये राहिली आहेत. विरोधात असलेल्या आमदारांनाही विकासासाठी निधी देण्याची त्यांची उदार भूमिका आजही अनेकांच्या स्मरणात आहे.


सोलापूरच्या विकासाचा दूरदृष्टीने केलेला पाया

सोलापूरच्या विकासाचा विचार केला तर सुशीलकुमार शिंदे साहेबांचे योगदान अत्यंत मोठे आहे. त्यांच्या प्रयत्नांतून आणि पाठपुराव्यातून सोलापूरला एनटीपीसी प्रकल्प, स्वतंत्र विद्यापीठ, औद्योगिक विकासाला चालना, चिंचोली औद्योगिक वसाहत, पाकणी एमआयडीसी, डाळिंब संशोधन केंद्र यांसारख्या अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांना गती मिळाली.

सोलापूर-पुणे-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण, सोलापूरला पुणे, मराठवाडा, हैदराबाद, गुलबर्गा आणि विजापूरशी उत्तम रस्ते जोडणी, रेल्वे सेवांचा विस्तार, सिद्धेश्वर एक्स्प्रेस आणि सोलापूर-पुणे हुतात्मा एक्स्प्रेस यांसारख्या सुविधांसाठी त्यांनी केलेले प्रयत्न सोलापूरकरांच्या कायम स्मरणात राहतील.


सोलापूर शहराच्या पाणीप्रश्नावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याच्या दृष्टीने उजनी-सोलापूर जलवाहिनी योजनेला त्यांनी चालना दिली. कुरनूर धरण, औद्योगिक प्रकल्प, अभियांत्रिकी व वैद्यकीय शिक्षणाच्या सुविधा, विविध केंद्रे आणि पायाभूत सुविधांच्या उभारणीतही त्यांचे योगदान राहिले आहे. बोरामणी आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाच्या दिशेनेही त्यांच्या कार्यकाळात महत्त्वाची पावले उचलली गेली.


सोलापूरच्या सांस्कृतिक क्षेत्रावरही त्यांचे विशेष प्रेम राहिले. साहित्य, संगीत आणि नाटक याविषयीची त्यांची आस्था सर्वश्रुत आहे. सोलापुरात राज्य नाट्य स्पर्धेचे केंद्र सुरू करण्यासाठी त्यांनी घेतलेला पुढाकार त्यांच्या रसिक व्यक्तिमत्त्वाची साक्ष देतो.


मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री म्हणून काम करताना सामाजिक न्यायाला त्यांनी विशेष महत्त्व दिले. दलित आणि आदिवासी समाजाच्या विकासासाठी महत्त्वाच्या तरतुदी असलेला अर्थसंकल्प मांडल्यामुळे त्यांच्या कार्यकाळातील अर्थसंकल्पाला ‘दलित-आदिवासी अभिमुख अर्थसंकल्प’ म्हणून विशेष ओळख मिळाली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर योजनेंतर्गत दरवर्षी मागासवर्गीय विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय हा सामाजिक परिवर्तनाच्या दिशेने महत्त्वाचा टप्पा होता. सर्वसामान्य, वंचित आणि दुर्बल घटकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याची त्यांची भूमिका त्यांच्या सार्वजनिक जीवनाचा महत्त्वाचा भाग राहिली.


केंद्रीय गृहमंत्री म्हणून देशाच्या अंतर्गत सुरक्षेशी संबंधित अत्यंत संवेदनशील जबाबदारी त्यांनी सांभाळली. त्यांच्या कार्यकाळात दहशतवादाशी संबंधित गंभीर प्रकरणांमध्ये केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी झाली. मात्र या कामाचे राजकीय श्रेय घेण्यासाठी स्वतःची पाठ थोपटून घेण्यापेक्षा कर्तव्य पार पाडणे आणि शांतपणे पुढे जाणे, हीच त्यांची कार्यशैली राहिली.

याच साधेपणामुळे आणि संयमी स्वभावामुळे सुशीलकुमार शिंदे साहेबांचे व्यक्तिमत्त्व इतर राजकीय नेत्यांपेक्षा वेगळे भासते. त्यांच्या चेहऱ्यावरील हास्य, मिश्कील विनोदबुद्धी, माणसांशी आपुलकीने संवाद साधण्याची पद्धत आणि प्रत्येकाला सन्मान देण्याची वृत्ती यामुळे ते सर्वसामान्यांच्या मनात आपलेसे झाले.


राजकारणात पन्नास-पंचावन्न वर्षे सातत्याने सक्रिय राहणे ही सोपी गोष्ट नाही. संघर्ष, अडचणी, हालअपेष्टा आणि अनेक राजकीय चढ-उतारांचा सामना करत सुशीलकुमार शिंदे साहेबांनी आपल्या शांत, संयमी, हसतमुख आणि निष्ठावान स्वभावाच्या जोरावर देशाच्या राजकारणात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले.

काँग्रेस पक्षाने त्यांना नगरसेवकापासून मुख्यमंत्री, राज्यपाल, केंद्रीय मंत्री, केंद्रीय गृहमंत्री आणि लोकसभेतील पक्षनेतेपदापर्यंत विविध महत्त्वाच्या जबाबदाऱ्या दिल्या. पुढे उपराष्ट्रपतीपदासाठी काँग्रेसचे उमेदवार म्हणूनही त्यांनी निवडणूक लढवली. हा संपूर्ण प्रवास त्यांच्या नेतृत्वक्षमतेचा आणि जनमानसातील स्वीकारार्हतेचा पुरावा आहे.


आज वयाची ८६ वर्षे पूर्ण करत असतानाही त्यांच्या अनुभवाची, मार्गदर्शनाची आणि विचारांची गरज काँग्रेस पक्षाला तसेच समाजाला आहे. आजच्या बदलत्या राजकीय परिस्थितीत लोकशाही, संविधानिक मूल्ये, सामाजिक समता आणि काँग्रेसच्या विचारधारेवर विश्वास ठेवणाऱ्या कार्यकर्त्यांना त्यांचे मार्गदर्शन निश्चितच प्रेरणादायी आहे.

सुशीलकुमार शिंदे साहेबांनी राजकीय जीवनात जे अनुभवले, शिकले, संघर्ष केला आणि मिळविले, तो वारसा पुढील पिढीसाठी मार्गदर्शक आहे. त्यामुळे त्यांचे मार्गदर्शन आणि सक्रिय योगदान यापुढेही काँग्रेस कार्यकर्त्यांना आणि समाजाला मिळत राहावे, हीच अपेक्षा.


सोलापूरच्या मातीचा अभिमान, महाराष्ट्राच्या राजकारणातील सुसंस्कृत नेतृत्व आणि देशाच्या राजकारणातील अनुभवी लोकनेते आदरणीय सुशीलकुमार शिंदे साहेबांना वाढदिवसानिमित्त आभाळभर शुभेच्छा!


आपल्याला उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि सदैव आनंद लाभो. आपल्या अनुभवाची व मार्गदर्शनाची सावली काँग्रेस कार्यकर्त्यांवर आणि सोलापूरकरांवर सदैव राहो, हीच मनःपूर्वक सदिच्छा!



Post a Comment

0 Comments