Ticker

6/recent/ticker-posts

महाराजस्व समाधान शिबिरात सोलापुरात ७१८ लाभार्थ्यांना दाखल्यांचे वाटप

 



सोलापूर - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस आणि दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून उत्तर तहसील कार्यालयामार्फत ‘छत्रपती शिवाजी महाराज अभियान’ अंतर्गत महाराजस्व समाधान शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. सोलापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज रंगभवन येथे पार पडलेल्या या शिबिराचे उद्घाटन आमदार देवेंद्र कोठे यांच्या हस्ते करण्यात आले.

या शिबिरात सर्वसामान्यांना एकाच छताखाली विविध शासकीय सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ८ महत्त्वाच्या शासकीय विभागांचे स्टॉल उभारण्यात आले होते. यामध्ये कृषी, महसूल, उपप्रादेशिक परिवहन (RTO), विद्युत वितरण, सहकार, नगर भूमापन, आरोग्य आणि एस.टी. महामंडळ या विभागांचा समावेश होता. या उपक्रमाचा लाभ घेत तब्बल ७१८ नागरिकांना उत्पन्न दाखले, जात प्रमाणपत्रे, रेशन कार्ड आणि आयुष्मान भारत कार्ड यांसारख्या विविध आवश्यक दाखले व कागदपत्रांचे जागीच वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाचे उद्घाटन करताना आमदार देवेंद्र कोठे म्हणाले, "सामान्य जनतेची कामे कमी वेळेत व्हावीत आणि त्यांना आवश्यक शासकीय दाखले एकाच ठिकाणी मिळावेत यासाठी राज्यभरात ही समाधान शिबिरे राबवली जात आहेत. जनतेला तत्पर सेवा देऊन त्यांचे समाधान करणे हेच शासनाचे मुख्य ध्येय आहे." प्रास्ताविकात तहसीलदार निलेश पाटील यांनी शिबिराची पार्श्वभूमी व उद्देश स्पष्ट केला.

या प्रसंगी माजी महापौर श्रीकांचना यन्नम, महापौर विनायक कोंड्याल, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, नगरसेविका रोहिणी तडवळकर, महिला बालकल्याण सभापती निर्मला जंगम आदी लोकप्रतिनिधी उपस्थित होते. प्रशासनाच्या वतीने उपविभागीय अधिकारी सदाशिव पडदूणे, तहसीलदार निलेश पाटील, तहसीलदार शिल्पा पाटील, तालुका कृषी अधिकारी रामचंद्र माळी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments