Ticker

6/recent/ticker-posts

फौजदार खाजा मुजावर यांच्याकडून बदनामीप्रकरणी अब्रूनुकसानीचा दावा । पहा विडिओ



सोलापूर : वरिष्ठांच्या आदेशानुसार केलेल्या कारवाईचा राग मनात धरून आपली जाणीवपूर्वक बदनामी केल्याचा आरोप करत सोलापूर ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेतील फौजदार म. इसाक (खाजा) मुजावर यांनी लोकशासन आंदोलन पार्टीचे मारुती नारायण जाधव आणि राजाभाऊ गुरुपाद दिंडोरे यांच्याविरुद्ध दिवाणी न्यायालयात विशेष अब्रूनुकसानीचा दावा दाखल केला आहे.

दाव्यानुसार, ८ जून २०२६ रोजी दोघांनी पक्षाच्या लेटरपॅडवर पत्रकार परिषद घेऊन फौजदार मुजावर यांच्याविरोधात खोटे व बदनामीकारक आरोप केले. या आरोपांमुळे त्यांच्या पदाची प्रतिष्ठा आणि जनमानसातील प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न झाल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यानंतर १० जून रोजी पुनम गेट परिसरात हलगी वाजवत, अंगावर झाडाचा पाला लावून आंदोलन करण्यात आले. यावेळी मोठ्या बॅनरवर बदनामीकारक मजकूर आणि छायाचित्र प्रसिद्ध करण्यात आल्याचाही आरोप आहे.

या प्रकरणी वरिष्ठांची परवानगी घेऊन फौजदार मुजावर यांनी दिवाणी न्यायाधीश वनकोरे यांच्या न्यायालयात विशेष दावा दाखल केला असून, त्यांच्यावतीने ॲड. प्रवीण शेंडे काम पाहत आहेत. तसेच पुनम गेट येथील आंदोलनासंदर्भात सदर बझार पोलीस ठाण्यात स्वतंत्र गुन्हाही नोंद करण्यात आला आहे.

पोलीस माहितीनुसार, मारुती जाधव आणि राजाभाऊ दिंडोरे यांच्याविरुद्ध विविध पोलीस ठाण्यांत सहा गुन्हे दाखल आहेत. जाधव यांच्यावर एमपीडीए कायद्यान्वये कारवाईचे आदेश जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी दिले होते. त्या आदेशाची अंमलबजावणी फौजदार मुजावर यांनी केली होती. त्याच कारवाईचा राग मनात धरून खोटे आरोप करण्यात आल्याचा दावा करण्यात आला असून, या प्रकरणामुळे खोटी बदनामी करणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाईचा इशारा मिळाल्याची चर्चा आहे.

पहा व्हिडिओ - 👇👇👇👇👇





Post a Comment

0 Comments