मोहोळ - माणसाच्या आयुष्यात कधी कुठले वादळ येईल आणि हसतं-खेळतं घर क्षणात कसं उध्वस्त होईल, याचा काही नेम उरलेला नाही. मोहोळ शहरातील अण्णाभाऊ साठे नगर परिसरात घडलेल्या एका घटनेने संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली आहे. अवघ्या २४ व्या वर्षी, भविष्याची सुंदर स्वप्ने डोळ्यांत घेऊन जगणाऱ्या 'कीर्ती'ने मृत्यूला जवळ केले आणि एका क्षणात शेजाळ कुटुंबाचा आनंद कायमचा हिरावून घेतला.
आय.सी.आय.सी.आय. (ICCI) बँकेत चांगल्या पदावर नोकरी करणारी, शिकलेली आणि हुशार मुलगी कीर्ती किसन शेजाळ, २९ जुलैच्या त्या दुर्दैवी पहाटे कायमची निघून गेली. नेहमीप्रमाणे उगवणारी ती सकाळ शेजाळ कुटुंबासाठी असा कधीही न पुसणारा काळोख घेऊन येईल, याची पुसटशी कल्पनाही कोणाला नव्हती.
त्या दुर्दैवी पहाटेची काळी रात्र...
पहाटे ५ वाजेच्या सुमारास कीर्तीच्या खोलीचा दरवाजा वाजवूनही आतून कोणताही प्रतिसाद येत नव्हता. आई-वडिलांच्या जीवाची कालवाकालव झाली. भावाने जेव्हा खिडकीची काच फोडून आत पाहिले, तेव्हा समोरचे दृश्य पाहून संपूर्ण कुटुंबाच्या पायाखालची जमीनच सरकली. लोखंडी पंख्याला साडीच्या साहाय्याने लटकलेला कीर्तीचा देह पाहून आई-वडिलांनी फोडलेला आक्रोश काळजाचा ठाव घेणारा होता.दरवाजा तोडून तिला तातडीने मोहोळच्या ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले, पण नियतीला काही वेगळेच मान्य होते. डॉक्टरांनी तपासण्यापूर्वीच तिला मृत घोषित केले. कालपर्यंत जी मुलगी घरामध्ये हसत-खेळत वावरत होती, कुटुंबाचा आधार बनत होती, ती आज कायमची शांत झाली होती.
अनेक अनुत्तरित प्रश्न आणि कधीही न भरणारी पोकळी-
वयाच्या अवघ्या २४ व्या वर्षी, हाताशी आलेली आणि शिकून पायावर उभी राहिलेली मुलगी असा टोकाचा निर्णय का घेईल? तिच्या मनात नक्की असं कोणतं दुःखाचं वादळ घोंघावत होतं? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आता कधीच मिळणार नाहीत. पण एका क्षणाच्या निर्णयाने एका आई-वडिलांची लाडकी लेक आणि एका भावाची सावली कायमची निघून गेली आहे.या घटनेने अण्णाभाऊ साठे नगरातील प्रत्येकाचे डोळे पाणावले आहेत. याप्रकरणी मोहोळ पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून सहाय्यक पोलीस निरीक्षक धुमाळ पुढील तपास करत आहेत. परंतु, पोलिसांचा तपास सुरू राहील, पण शेजाळ कुटुंबाच्या आयुष्यात निर्माण झालेली ही पोकळी आता कधीच भरून निघणार नाही.

0 Comments