सोलापूर - "माझी मुलगी मंदबुद्धी आहे, तिला काम जमत नाही..." असे बसता-उठता मारलेले टोमणे, व्यवसायातील नुकसानीचे खापर डोक्यावर फोडून माहेरून ५ लाख रुपये आणण्यासाठी पाशवी मानसिक व शारीरिक छळ आणि शेवटी अवघ्या २६ वर्षांच्या सादियाचा झालेला संशयास्पद अंत! सोलापूरच्या एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मुळेगाव रोड परिसरात घडलेल्या या घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे.
काय आहे प्रकरण?
उमरगा (जि. धाराशिव) येथील शेतमजूर फारुख कासिम जमादार यांची मुलगी सादिया हिचा विवाह २७ मार्च २०२३ रोजी सोलापूर येथील अहमद काझी याच्याशी पार पडला. लग्नानंतर सुरुवातीचे काही महिने सर्व काही व्यवस्थित चालले. सादियाला दोन लहान अपत्ये—दोन वर्षांचा मुलगा अब्दुल्ला आणि आठ महिन्यांची मुलगी अलमेला आहेत. परंतु, पहिल्या बाळंतपणानंतर सादियाच्या आयुष्याला ग्रहण लागले.
व्यवसायात नुकसान आणि ५ लाखांची मागणी
जावई अहमद याने मत्सपालनाचा व्यवसाय सुरू करण्यासाठी सादियाच्या वडिलांच्या ओळखीने जकेकुर येथे ५ लाख रुपयांच्या करारावर शेतजमीन घेतली होती. मात्र, या व्यवसायात अहमदला ५ लाख रुपयांचा मोठा तोटा झाला. या नुकसानीचे सर्व खापर सादिया आणि तिच्या गरीब माहेरच्यांवर फोडण्यात आले. "तुझ्या बापामुळेच आमचे नुकसान झाले आहे, आता लोकांचे पैसे देण्यासाठी माहेरून ५ लाख रुपये घेऊन ये," अशी मागणी करत सादियाचा पती अहमद, सासू सबीया आणि सासरा शकिल यांनी तिचा छळ सुरू केला.
आजारी लेक आणि टोमण्यांचा भडीमार
सादियाच्या दुसऱ्या लहान मुलीच्या हृदयाला छिद्र असल्याचे निष्पन्न झाले. एवढेच नाही तर सादियाला स्वतःलाही थायराॉईडचा आजार झाला होता. तरीही सासरच्यांनी दया दाखवण्याऐवजी "तू आजारी पडतेस आणि छिद्र असलेले मूल जन्माला घातलेस," असे म्हणून तिचा अधिकच जाच सुरू केला. मुलीच्या उपचाराचा सर्व खर्च सादियाच्या गरीब वडिलांनाच करावा लागत होता. सादियाला मोबाईल वापरू दिला जात नव्हता; ती कधीतरी लपून-छपून नातेवाइकांना फोन करून आपल्यावर होणारा अत्याचार सांगायची.
१७ सप्टेंबरची ती काळरात्र...
१७ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता सादियाच्या पतीने वडिलांना फोन करून "तुमची मुलगी माझ्याशी भांडत आहे" असे सांगून फोन कट केला. त्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच सासरा शकिल काझी याने फोन करून "तुमच्या मुलीने आतून कडी लावून घेतली आहे" आणि थोड्याच वेळात "तुमच्या मुलीने फाशी घेतली आहे, लवकर या!" असा निरोप दिला. हा धक्कादायक फोन येताच नातेवाइकांनी सोलापूरकडे धाव घेतली, मात्र रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच सादियाचा मृत्यू झाला होता.
पती, सासू अन् सासऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल
सासरच्यांच्या सततच्या मानसिक व शारीरिक जाचाला, टोमण्यांना आणि ५ लाख रुपयांच्या हुंड्याच्या मागणीला कंटाळूनच सादियाने राहत्या घरी साडीने गळफास लावून आत्महत्या केल्याचा आरोप तिच्या वडिलांनी केला आहे. याप्रकरणी सोलापूरच्या एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रारदार फारुख जमादार यांच्या फिर्यादीवरून पती अहमद शकिल काझी, सासू सबीया शकिल काझी आणि सासरा शकिल काझी या तिघांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (BNS) विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक गणेेेश इंगळे करत असून, एका नवविवाहितेच्या अशा दुर्दैवी अंतामुळे हळहळ व्यक्त होत आहे.

0 Comments