Ticker

6/recent/ticker-posts

अपघातात सोलापूरचे युवा समाजसेवक विजय जाधव यांचे निधन


सोलापूर - गिरीकर्णिका फाउंडेशनचे अध्यक्ष व सोलापूर विकास मंचचे सक्रिय कार्यकर्ते विजय कुंदन जाधव यांचे शनिवारी मध्यरात्री डीआरएम कार्यालयासमोर झालेल्या दुचाकीच्या भीषण अपघातात दुर्दैवी निधन झाले. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या आकस्मिक निधनाने सोलापूर शहर व जिल्ह्यातील सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय वर्तुळात तीव्र शोककळा पसरली आहे.

विजय जाधव यांनी सोलापूरच्या सर्वांगीण विकासासाठी आणि नागरी प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवला. पायाभूत सुविधा, वाहतूक शिस्त, विमानसेवा, सार्वजनिक परिवहन, आयटी पार्क, रोजगारनिर्मिती आणि उच्च न्यायालयाचे खंडपीठ यांसारख्या अनेक मुद्द्यांवर त्यांनी शासन दरबारी व आंदोलनांच्या माध्यमातून पाठपुरावा केला. वाहतुकीची शिस्त आणि मोडीत आलेली बससेवा सुधारण्यासाठी त्यांनी उपोषणेही केली.

पर्यावरण संवर्धनासाठी त्यांनी ‘मिशन ३८’ हा विशेष उपक्रम सुरू केला होता, ज्याद्वारे जिल्ह्याचे तापमान नियंत्रित ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न होता. सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी तब्बल ६३ वेळा रक्तदान केले होते व आपत्कालीन रुग्णांसाठी अ‍ॅफेरेसिस प्लेटलेट्सचे दान केले होते. शैक्षणिक क्षेत्रातही त्यांचा सक्रिय सहभाग होता; महाविद्यालयांमध्ये अतिथी व्याख्याते म्हणून 'आर्टिफिशियल इंटेलिजन्स' सारख्या आधुनिक विषयांवर त्यांनी मार्गदर्शन केले.

मावा, मटका व मिरवणुकीतील गैरप्रकार थांबवण्यासाठी त्यांनी सातत्याने स्पष्ट भूमिका घेतली. शनिवारीच एका कार्यक्रमात त्यांच्या हस्ते श्री गणरायाचे पूजन झाले होते, मात्र त्याच रात्री काळाने त्यांच्यावर घाला घातला. रविवारी छत्रपती शिवाजी महाराज (सिव्हिल) रुग्णालयात शवविच्छेदन झाल्यानंतर पार्थिव अवंती नगर येथील त्यांच्या निवासस्थानी अंतिम दर्शनासाठी नेण्यात येणार आहे. त्यांच्या जाण्याने सोलापूरने एक अभ्यासू आणि तळमळीचा युवा नेता गमावला आहे.


Post a Comment

0 Comments