सोलापूर: दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग येथे घडलेल्या सद्दाम अमलीचुंगे यांच्या खून प्रकरणातील आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत (मोका) कठोर कारवाई करावी, अशी मागणी जमियत उलेमा-ए-हिंद संघटनेने पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
९ सप्टेंबर रोजी गावात केवळ दहशत व वर्चस्व निर्माण करण्याच्या उद्देशाने बुडन कटरे, यासीन कटरे, उपसरपंच समीर कटरे यांच्यासह ५० ते ६० जणांच्या टोळक्याने अमलीचुंगे कुटुंबावर कोयता, लोखंडी पाईप, रॉड आणि लाठ्या-काठ्यांनी प्राणघातक हल्ला केला होता. या हल्ल्यात सद्दाम अमलीचुंगे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
हा हल्ला पूर्वनियोजित आणि संघटित गुन्हेगारीचा भाग असून यामुळे गावात दहशतीचे वातावरण आहे. त्यामुळे या प्रकरणातील सर्व मुख्य आरोपी व त्यांच्या साथीदारांवर तात्काळ ‘मोका’ अंतर्गत कारवाई करून पीडित कुटुंबाला न्याय द्यावा, अशी ठाम मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

0 Comments