सोलापूर- सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील वरवडे टोल नाक्याजवळ आज, मंगळवारी (दि. ४ ऑगस्ट) सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास शिवशाही बसचा भीषण अपघात टळला. ब्रेक फेल झाल्यामुळे भरधाव बस महावितरणच्या खांबाला धडकून मोकळ्या जागेत गेली. बसचालकाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे १४ प्रवाशांचे प्राण वाचले असून सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झालेली नाही.
चालकाचे प्रसंगावधान-
सोलापूरहून पुण्याच्या दिशेने निघालेल्या शिवशाही बसचा (क्रमांक MH 06 BW 3522) वरवडे टोल नाक्याजवळ अचानक ब्रेक फेल झाला. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून चालक श्री. शिवशरण भोगेश्वर म्हेत्रे (वय ५६, रा. अक्कलकोट) यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे बस रस्त्याच्या बाजूला असलेल्या विटा टाकलेल्या मोकळ्या जागेत घालण्यात आली.यादरम्यान बसने महावितरणच्या विजेच्या खांबाला जोरदार धडक दिली. या धडकेत खांब उन्मळून पडला आणि विजेच्या तारा बसवर पडल्या. मात्र, सुदैवाने मोठा अनर्थ टळला.
मदतकार्य व वाहतूक पूर्ववत-
अपघाताची माहिती मिळताच वरवडे टोल नाक्याचे गस्तीपथक आणि रुग्णवाहिका पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले.डॉ. महेंद्र ताकतोडे, रुग्णवाहिका चालक बंडू गायकवाड, गस्तीपथकाचे विजय साळुंके, अभिजीत गुजरे आणि नवनाथ मोरे यांनी तातडीने बचावकार्य सुरू केले. बसमधील सर्व १४ प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढून त्यांना दुसऱ्या एसटी बसने पुढील प्रवासासाठी रवाना करण्यात आले.मोडनिंब महामार्ग पोलीस मदत केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली. गस्तीपथकप्रमुख विजय साळुंके यांनी टेंभुर्णी पोलीस ठाण्याच्या अपघात विभागाचे अधिकारी श्री. सरडे यांना या अपघाताची माहिती दिली.

0 Comments