Ticker

6/recent/ticker-posts

अकलुज पोलिसांचा धडाका ; १७ पिस्तुले, ४७ काडतुसे जप्त

 


सोलापूर- विनापरवाना देशी बनावटीची अग्निशस्त्रे आणि जिवंत काडतुसे विक्री करणाऱ्या टोळीचा अकलुज पोलिसांनी पर्दाफाश केला. पोलिसांनी सहा आरोपींना अटक करून त्यांच्याकडून १७ पिस्तुले, ४७ जिवंत काडतुसे आणि टाटा नेक्सॉन कार असा एकूण १८ लाख ४७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे माढा, पंढरपूर, सांगोला तसेच सांगली आणि कर्नाटकपर्यंत पसरलेल्या बेकायदा शस्त्रविक्रीचे धागेदोरे समोर आले आहेत.

अटक आरोपींमध्ये विकास कैलास वजाळे (३१, रा. परीते, ता. माढा), राहुल सतीश माने (३४, रा. मिरज), महादेव बाळासाहेब कोरके (३०, रा. करकंब), विजय सदाशिव किरणगी (३४, रा. शिवणुर, कर्नाटक), अनिल पंचलाल मेहता (३२, रा. रांजणगाव, मध्य प्रदेश) आणि सुमित नाना लवटे (१९, रा. भुईटे वस्ती, सांगोला) यांचा समावेश आहे. प्रदीप पांडुरंग माने आणि शनि भारत बनसोडे हे दोघे फरार आहेत.

१४ ऑगस्ट रोजी अकलुज पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार परीते येथील विकास वजाळे याला टाटा नेक्सॉन कारसह ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून दोन पिस्तुले आणि चार जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. चौकशीत त्याने ही शस्त्रे राहुल माने याच्याकडून घेतल्याची तसेच विविध ठिकाणी विक्री केल्याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी करकंब, सांगोला, अकोले खुर्द, मिरज आणि कर्नाटक येथे कारवाई करत शस्त्रे जप्त केली.

दरम्यान, विकास वजाळे याने मध्य प्रदेशातील अनिल पंचलाल मेहता याच्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणल्याची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी सोनगीर, धुळे येथे सापळा रचला. तेथे मेहता याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून चार अग्निशस्त्रे आणि २५ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. त्यानंतर राहुल माने यालाही टेंभुर्णी परिसरातून अटक करण्यात आली.

सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, पंढरपूर विभागाच्या अपर पोलीस अधीक्षक प्रेरणा कटे आणि अकलुज विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष वाळके यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. अकलुजचे पोलीस निरीक्षक नीरज उबाळे, सहायक पोलीस निरीक्षक अंकुश वाघमोडे, सहायक पोलीस निरीक्षक विक्रम साळुंखे यांच्यासह पोलिसांच्या पथकाने कारवाई केली.

Post a Comment

0 Comments